बिचुकले येथील दांडिया कार्यक्रमातील घटना
वाठार स्टेशन – बिचुकले (ता. कोरेगाव) येथे नवरात्रोत्सवात गाणी वाजवण्यासाठी आलेल्या बॅंडच्या गाडीत विजेचा शॉक लागल्याने वाठार स्टेशन येथील ओंकार विजय लोंढे (वय 23) हा युवक ठार झाला.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन येथील तुकाराम माने यांची बॅंडची गाडी शुक्रवार, दि. 20 रोजी सायंकाळी सहा वाजता बिचुकले येथे नवरात्र उत्सवानिमित्त गाणी वाजवण्यासाठी गेली होती. या गाडीबरोबर ओंकार लोंढे गेला होता. गाडीतील उपकरणे चालविण्यासाठी गावात असलेल्या ग्रामपंचायतीच्या बोअरवेलच्या स्टार्टरमधून विजेचे कनेक्शन घेतले होते.
दरम्यानच्या काळात सायंकाळी सातच्या दरम्यान दांडीयाचा कार्यक्रम सुरू असताना गाडीमध्ये करंट उतरला होता. यावेळी गाडीमध्ये असलेला ओंकार लोंढे हा अनवाणीच गाडीच्या दरवाजाच्या बारला पकडून खाली उतरत असताना, त्याचा पाय जमिनीवर पडताच शॉक लागून तो बेशुद्ध पडला.
त्यावेळी गावातील लोकांच्या मदतीने त्यास वाठार स्टेशन येथील खाजगी रुग्णालयात आणले. तेथून पुढील उपचारासाठी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची फिर्याद अजित लोंढे यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली असून तपास हवालदार दिपाली पोरे तपास करीत आहेत.