पुणे – मोबाईल ऍपवरून सेवा देणाऱ्या कंपन्या ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर मोठ्या होत आहे, त्याच कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 25 ऑक्टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर यासह स्वीगी आणि झोमॅटोवर सेवा देणारे सर्व कर्मचारी सामूहिक बंद पाळणार आहे, अशी माहिती डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओला-उबर, स्वीगी, झोमॅटो, पोर्टर या मोबाईल ऍपवरून प्रवासी सेवेसह खाद्य पदार्थांची डिलिव्हरी घरबसल्या मिळते. त्यासाठी दिवस-रात्र कर्मचारी काम करतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ओला-उबरवर काम करणारे जवळपास दीड लाख चालक आहेत. तर स्वीगी, झोमॅटो, पोर्टरवर काम करणाऱ्या डिलिव्हरी युवक-युवतींची संख्या तीस हजारांच्या आसपास आहे. या सर्वांसाठी राज्य शासनाने महाराष्ट्रातही गीग वर्कर्स रजिस्ट्रेशन अँड वेल्फेअर ऍक्ट पारित करावा.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केंद्र सरकारच्या कॅब ऍग्रीकेटर गाईडलाईन्स 2020 ची अंमलबजावणी व्हावी आणि खटुआ समिती शिफारशीनुसार रिक्षा व टॅक्सीप्रमाणे कॅब्सचेही दर निर्धारित करणे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत कायदा आणून न्याय मिळावा, अशी मागणी डॉ. क्षीरसागर यांनी केली.
या आहेत अडचणी…
- चालक आणि डिलिव्हरी बॉईजला कुठल्याही प्रकारचा ऑनलाइन किंवा ऑफलाईन सपोर्ट नाही.
- कोणतीही शहानिशा न करता परस्पर आयडी ब्लॉक करणे आणि तो सुरू करण्यासाठी दलालामार्फत पैसे उकळणे.
- मॅपमधील अंतर चुकीचे दाखविणे
- कर्मचाऱ्यांना कमी दरावर काम करायला भाग पाडणे
- टुरिस्ट बुकिंगमध्ये पांढऱ्या नंबर प्लेट असलेल्या गाड्यांचा वापर करून शासन व प्रवाशांची फसवणूक करणे
कर्मचाऱ्यांना दाद मागण्याची सुविधा नसणे