आमदार अशोक पवार यांच्याकडून पाहणी
वाघोली – येथील बायफ रोडच्या परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून याची आमदार अशोक पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तातडीने दूर करण्याच्या सूचना आमदार पवार यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.
वाघोली येथील सवाना सोसायटीच्या परिसरातील सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याबाबत आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शाखाली बैठक झाली. या ठिकाणी सांडपाण्याचे नियोजन नसल्यामुळे जवळपास 10-12 सोसायटीच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून तसेच जवळ असलेल्या शाळेमध्ये जवळपास 1,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून आहेत.
त्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होऊ शकतो याचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत सदरील काम लवकरच मार्गी लावण्याबाबत सूचना आमदार पवार यांनी केल्या आहेत. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे व ग्रामस्थ, सोसायटी मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सांडपाण्यास जबाबदार कोण?
वाघोलीमध्ये अनेक गृह प्रकल्पाचे सांडपाणी व्यवस्थापन संबंधित बांधकाम व्यावसायिक यांनी वेळेवर करणे गरजेचे होते; मात्र काही ठिकाणी सांडपाण्याचे व्यवस्थापन संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात आले नसल्याने आता याचा भार सोसायटी धारकांवर येऊ लागल्याने प्रश्न अजून गंभीर होऊ लागले आहेत.
वाघोली गावाचा पुणे मनपात समावेश होण्यापूर्वी अनेक कामे अर्धवट राहिली होती. यासाठी निधीची मागणी पुणे मनपा प्रशासनाकडे केली होती; मात्र निधीअभावी कामे होऊ शकली नाहीत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासनाकडे सांडपाण्याचा प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-महेंद्र भाडळे, माजी उपसरपंच वाघोली