पुणे – पीएमपी बसने प्रवास करताना तिकिटासाठी सुट्टे पैशावरून होणारी कीटकीट आता थांबणार आहे. पीएमपी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी कॅशलेस पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता गुगल पे, फोन पे किंवा अधिकृत ऍपवरून “क्यु आर कोड स्कॅन’ करताच तिकिट मिळणार. त्यामुळे वेळ आणि कीटकीट थांबणार.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 1 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड आगार याठिकाणी या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. पीएमपीमध्ये 2015 पासून ई-तिकिट मशीन प्रणाली सुरू करण्यात आली होती. परंतू, डिजटल पेमेंट सुविधा काही तांत्रिक कारणामुळे सुरू झाली नाही.
मात्र, वाढती प्रवाशी संख्या आणि त्यांच्या वारंवार होत असलेल्या मागणीनुसार मे. ईबिक्स कॅश कंपनी आणि सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया यांच्या बैठकीत ई-तिकीट मशीनमधून डिजिटल पेमेंट सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान बाणेर आगारामध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू केली. हा प्रयोग यशस्वी झाला असून, 1 ऑक्टोबरपासून सर्व आगारांमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे.
असा होईल फायदा...
- तिकीटासाठी सुट्टे पैसाची किटकिट थांबणार
- वाहकाकडील कॅश व्यवहार कमी होणार; कामाची गती वाढणार
- दररोजची कॅश थेट बॅंकेत जमा होणार
- डिजिटल इंडिया या संकल्पनेला हातभार
काय आहे ही पद्धती…
- वाहकाकडे ऑनलाईन क्यूआर कोडची मागणी करणे.
- क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करणे.
- वाहकाकडून निर्माण होणारे आपले तिकीट प्राप्त करणे.
“शहरातील सर्व बस आगारांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे वेळ आणि दररोज सुट्टे पैसावरून होणारे वाद कमी होतील. या सेवेमुळे कामात गतीशिलता वाढेल.” – सचिंद्रप्रताप सिंह, अध्यक्ष व संचालक, पीएमपीएमएल