विशेष शाखेकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू
शहरात 325 परदेशी नागरिकांची यादी
दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याने शोधण्यात अडचणी
संजय कडू
पुणे – पुणे शहरात परदेशी नागरिक शिक्षण आणि व्यवसायानिमीत्त वास्तव्य करतात. यासाठी स्टुडंट व्हिसा किंवा बिझनेस व्हिसा घ्यावा लागतो. या व्हिसाची मुदत संपल्यावर काही जण मुदत वाढवून काही दिवस वास्तव्य करतात. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य केल्यास ते बेकायदेशीर ठरते, कायदा-सुव्यवस्थेच्या दुष्टीनेही बेकायदा वास्तव्य करणारे असे परदेशी नागरिक धोकादायक ठरु शकतात, अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना पुन्हा मायदेशी पाठविण्यासाठी पुणे शहरात पोलिसांनी अशा नागरिकांची यादी तयार केली आहे. त्यानूसार तब्बल 325 नागरिक पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे तसेच ते दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड झाले झाले.
पोलिसांनी केलेल्या यादीत 2016 पासून देशात बेकायदा मुक्काम केलेल्या परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हे परदेशी नागरिक येमेन, उझबेकिस्तान, इराण, कझाकस्तान, युगांडा आणि नायजेरिया येथून भारतात आले आहेत. यापैकी सुमारे 90% परदेशी नागरिक पुण्यातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी तर इतर पर्यटक, वैद्यकीय आणि व्यावसायिक व्हिसावर भारतात आले आहेत, असे पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) आर. राजा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात बेकायदा मुक्काम करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोधण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतर शहर तसेच देश सोडणे आवश्यक होते. मात्र, ते बेकायदा वास्तव्य करीत आहेत. यासंदर्भात आम्ही इमिग्रेशन ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली आहे. या परदेशी नागरिकांची यादी आमच्या दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू आणि इतर शहरांमधील समकक्ष विभागांशी शेअर केली गेली आहे. त्यांचा ठावठिकाणा समजलेल्या जागी पथके पाहणी करीत आहेत. परदेशी नागरिकांनी ज्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला, त्यांनाही पथके भेट देत आहेत.
व्हिसा मुदतवाढीचा फंडा..
व्हिसाची मुदत वाढवून मिळणार नाही, हे लक्षात येताच काही परदेशी नागरिक दिलेला पत्ता बदलून बेकायदा वास्तव्य करतात. अनेकदा ते त्यांच्या देशातील येथे कायदेशीर राहणाऱ्या नागरिकांच्या निवासस्थानी वास्तव्य करतात. तसेच, आपला अभ्यासक्रम कधीच वेळेत पूर्ण करीत नाहीत. व्हिसाची मुदत वाढवून मिळण्यासाठी हा एक फंडा वापरला जातो.