– हिमांशू
जुन्या काळातली फळ्यांची दारं असलेली किराणा मालाची दुकानं आता फारशी पाहायला मिळत नाहीत. कर्रकर्र असा कर्कश आवाज करत उघडझाप करणारी लोखंडी शटर्स आता भाजीपाल्याच्या दुकानांनाही बसवलेली असतात. किराणा मालाच्या दुकानात पूर्वी वर्तमानपत्राच्या पुड्या असत आणि सगळं पॅकिंग होईपर्यंत ग्राहकाच्या मुलांना चघळण्यासाठी दुकानदार फुकट चॉकलेटं देत असत. या दुकानदारांचा एक शिरस्ता असायचा. मिठाचं पोतं हे दुकानदार कधीही दुकानाच्या आत ठेवत नसत. दुकान बंद झालं तरी मिठाचं पोतं बाहेरच ठेवलं जात असे. त्या मिठाची चोरी कुणी करत नसे. जुन्या पद्धतींबरोबर जुनी व्यापारसंस्कृतीही गेली आणि आपल्याकडे जनरल स्टोअर्स आली. नंतर डिपार्टमेन्टल स्टोअर्स, मग मिनी बाजार आणि नंतर अवाढव्य मॉल आले.
या मॉलमध्ये सगळा खुल्ला मामला. ग्राहकानंच फळीवरून हवं ते साहित्य काढून घ्यायचं. कार्टमध्ये टाकून काउंटरपर्यंत न्यायचं. तिथं बंदुकीसारख्या उपकरणानं प्रत्येक वस्तूचा टॅग तपासून ऑटोमॅटिक बिलिंग होणार. मग “कॉम्प्लिमेन्टरी’ म्हणून मिळणाऱ्या तागाच्या पिशवीत भरून सगळ्या वस्तू घरी न्यायच्या. मॉलचे कर्मचारी इकडेतिकडे दिसतात; पण आस्थेनं विचारपूस करून ग्राहकाला मदत करण्याऐवजी कोऱ्या चेहऱ्यानं उभे असतात. आपण विचारलं तरच ते बोलतात, तेही मोजकंच! ही “खुल्लं दुकान’ संस्कृती ज्या पाश्चात्यांकडून आपण घेतली, तेच आता खुलेपणा कमी करतायत ही बातमी जितकी मनोरंजक आहे, तितकीच ती क्लेषदायक आहे.
अमेरिकेत सध्या महागाईनं कळस गाठलाय. तिकडचे गलेलठ्ठ पगार आपल्याला इथून चांगले वाटतात; पण तिथल्या खर्चाचा अंदाज आपल्याला येत नसल्यामुळं दुरून डोंगर साजरे असंच ही बातमी वाचून वाटलं! आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेचं रेटिंग “ट्रिपल ए’वरून “डबल ए प्लस’ झालंय. रेटिंग कंपन्या भारतावरच डूख धरून आहेत, असं समजायचं कारण नाही हेही यावरून लक्षात यावं. महागाईचा दर 3.20 टक्क्यांवर पोहोचल्यामुळं सर्वसामान्य ग्राहक हैराण झालेत. शिवाय, बेरोजगारी वगैरे प्रश्न तिथेही आहेतच. “खुलं दुकान’ संस्कृतीत वाढलेल्या आणि नीतिमत्तेला सरावलेल्या काहीजणांना आता दुकानांमधून चोऱ्या करण्याची दुर्बुद्धी सुचू लागलीये. त्यामुळं टूथपेस्ट, चॉकलेटं, वॉशिंग पावडर अशा वस्तूही दुकानदार कुलपात ठेवू लागलेत, असं या बातमीत म्हटलंय.
चोरी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये झालेली वाढ, हे यामागचं कारण सांगितलं जातंय. पारदर्शक दरवाज्यांचे फ्रिज हल्ली आपल्याकडेही भरपूर दिसतात. बऱ्याच दुकानांमध्ये हवं ते कोल्ड्रिंक ग्राहक स्वतःच या फ्रिजमधून बाहेर काढतो आणि काउंटरवर बिल देतो. अमेरिकेत आता अशा फ्रिजना साखळी असलेलं कुलूप लावायची वेळ आलीये. ही परिस्थिती कुठल्याही “एनआरआय’कडून आपल्याला कळणार नाही. वॉलमार्ट ही अमेरिकेतली मॉलची सगळ्यात मोठी चेन आहे.
या कंपनीनं शिकागो शहरातली चार दुकानं बंद केलीत, कारण भुरट्या चोरांमुळं कंपनी त्रस्त झालीये. अशाच मोठमोठ्या कंपन्यांना आपली स्टोअर्स चोरांपासून सुरक्षित राखताना घाम फुटलाय. जगभरातल्या लोकांना अमेरिकेचं आकर्षण आहे आणि तिथली भक्कम अर्थव्यवस्था हेच त्यामागचं कारण आहे. अशा देशात महागाईमुळं लोकांचं जगणं अवघड बनलं असेल, ते चोऱ्या करू लागले असतील हे कुणालाच पटणार नाही. काळ बलवान असतो, हेच खरं!