भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अविभाज्य भाग असलेले महात्मा गांधी यांना त्यांच्यावर निर्माण झालेल्या चित्रपटानंतरच जग ओळखू लागले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केल्यामुळे वादविवाद निर्माण होणे अपेक्षितच आहे. कारण, नरेंद्र मोदी यांनी केलेले हे विधान निश्चितच वादग्रस्त आणि संभ्रम निर्माण करणारे मानावे लागेल.
लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असतानाही काही वाहिन्यांवर नरेंद्र मोदी यांच्या मुलाखती सुरू आहेत आणि निवडणुकीचा शेवटचा टप्पा होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे विधान केले आहे. जागतिक पातळीवरील नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर किंवा इतर नेत्यांच्या तुलनेमध्ये महात्मा गांधीजींची ओळख जगाला नव्हती. 1982 मध्ये आलेल्या ‘गांधी’ चित्रपटामुळे संपूर्ण जगाला गांधी कळून चुकले, असा दावा नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे. हा दावा करत असताना गांधीजींची लोकप्रियता जगाच्या पातळीवर सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण काहीही केले नाही हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला, तरी त्यानिमित्ताने गांधीजींसारख्या सर्वात लोकप्रिय नेत्याची लोकप्रियता कमी होती हेही दाखवण्याचा प्रयत्न त्यातून झाला आहे. कारण, नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये ज्या दोन नेत्यांचा उल्लेख केला त्यापैकी नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर हे महात्मा गांधी यांनाच आपले दैवत आणि मार्गदर्शक मानत होते.
गांधीजींच्या तत्त्वाच्या आधारेच या दोघांनी आपापल्या देशांमध्ये सामाजिक चळवळी उभारल्या होत्या आणि यशस्वी करून दाखवल्या होत्या. भारताच्या दीडशे वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासामध्ये हजारो लोकांनी विविध कारणांनी आपला ठसा उमटवला असला, तरी भारतातील प्रमुख नेते म्हणून आजही महात्मा गांधीच जगाला माहीत आहेत, हे नाकारून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या गुजरात राज्यातून आले आहेत त्याच गुजरातमधून आलेल्या महात्मा गांधी यांच्या लोकप्रियतेची खरी जाणीव नरेंद्र मोदी यांना नाही ही खरेच खेदाची बाब आहे. जगातील अनेक देशांमध्ये महात्मा गांधी यांचे पुतळे आहेत. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा अभ्यास करण्यासाठी अध्यासन स्थापन झालेली आहेत. जगाच्या पाठीवरील हजारो विद्यार्थी सध्या गांधीवादाचा अभ्यास करत आहेत.
खरेतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत उडी घेण्यापूर्वी महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत दीर्घकाळ वर्णद्वेषी राजवटीविरुद्ध लढा दिला होता. त्यामुळे तेव्हापासूनच महात्मा गांधी हे नाव संपूर्ण जगाला माहीत झाले होते. सत्य आणि अहिंसा या दोन शस्त्रांच्या बळावर काय करता येऊ शकते याचे प्रत्यक्ष दर्शन महात्मा गांधी यांनी आपल्या जीवन काळामध्ये संपूर्ण जगाला घडवले असल्याने केवळ एका चित्रपटानंतर महात्मा गांधींची ओळख जगाला होऊ शकली, असे म्हणणे म्हणजे घोर अज्ञानाचे लक्षण मानावे लागेल.
नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीमध्ये महात्मा गांधी यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि त्यांना जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवण्यासाठी स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये सरकारांनी फारसे काही केले नाही असे म्हणायचे असावे; पण ते वास्तव नाही. कारण 1982 मध्ये आलेल्या ‘गांधी’ चित्रपटापूर्वीच महात्मा गांधी यांची लोकप्रियता जगाचा कानाकोपर्यात पोहोचली होती. केवळ पोस्ट कार्डावर महात्मा गांधी, भारत असा पत्ता लिहिला तरी ते पत्र महात्मा गांधीजींच्या पत्त्यावर पोहोचायचे असे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. ही सर्व परिस्थिती असतानाही नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचे विधान करून विनाकारण वाद ओढवून घेतला आहे. या विधानानंतर काँग्रेसने त्यावर जरी प्रतिक्रिया दिली असली तरी ज्या प्रमाणात याबाबत तीव्रतेने टीका व्हायला हवी होती ती होत नाही हे सुद्धा दुर्दैवाने मान्य करावे लागते. पण फक्त काँग्रेसने या विषयावर भूमिका घेऊन चालणार नाही इतरांनीही घ्यायला हवी.
ज्या देशातील विद्यापीठांमध्ये गांधीवाद सातत्याने शिकवला जातो, ज्या देशाच्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे आणि ज्या देशाच्या अनेक विकासात्मक योजनांचे नाव महात्मा गांधी या शब्दांनी सुरू होते त्या देशामध्ये पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून अशी चुकीची माहिती प्रसारित होत असेल, तर त्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध होणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याबाबत कदाचित सारवासारव केली जाऊ शकते. पण त्यांनी या व्हिडिओ इंटरव्ह्यूमध्ये जे विधान केले आहे ते अनेकांनी पाहिले असल्याने त्या सारवासारव करण्यालाही काही अर्थ राहणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कोणावरही बायोपीक निघत आहेत. याचा अर्थ त्या बायोपिकनंतरच ती व्यक्ती लोकप्रिय होते असे नाही. ती व्यक्ती आधी लोकप्रिय असते म्हणूनच तिच्यावर चित्रपट निर्माण होतो हे ढळढळीत वास्तवही नरेंद्र मोदी यांनी लक्षात घ्यायला हवे होते. रिचर्ड अॅटनबरो यांनी निर्माण केलेला ‘गांधी’ हा चित्रपट अत्यंत उत्कृष्ट होता आणि गांधीजींच्या जीवनातील प्रत्येक घटनेचे दर्शन त्यामध्ये घडवण्यात आले होते. त्यामुळे गांधीजींचे चरित्र संपूर्णपणे जगापर्यंत पोहोचवण्याचे काम या चित्रपटाने निश्चितच केले; पण या चित्रपटामुळेच गांधीजी लोकप्रिय झाले आणि जगाच्या कानाकोपर्यात पोहोचले हे म्हणणे मात्र चुकीचेच मानावे लागणार आहे. महात्मा गांधी हीच भारताची ओळख आहे आणि ती यापुढेही कायम राहणार आहे याबद्दल कोणालाच शंका असण्याचे कारण नाही.