बड्या राज्यांच्या विघटनाची योजना?
नवी दिल्ली, दि. 5 – देशातील मोठ्या राज्यांचे विघटन करून छोट्या-छोट्या राज्यांत त्यांचे रूपांतर करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे व गृहमंत्री चरणसिंग यांनी याविषयी पंतप्रधानांशी सर्वसाधारण मुद्द्यांवर चर्चाही केली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व बिहार या चार राज्यांचा या दृष्टीने विचार चालू आहे.
पूर्वीच्या पंजाबचे विघटन करून पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेश ही राज्ये स्थापन करण्यात आल्यानंतर हरियाणा व हिमाचल प्रदेश यांनी जी प्रगती केली आहे, तिचा या नव्या योजनेच्या पुष्ट्यर्थ निर्देश केला जात आहे.
पक्षबदल विरोधी विधेयक?
नवी दिल्ली – पक्षबदलास प्रतिबंध करणाऱ्या विधेयकाविषयी कायदामंत्री शांतिभूषण म्हणाले, की संसदेच्या पुढील अधिवेशनापूर्वी सरकार इतर पक्षांशी पक्षबदलाबाबत पुन्हा सल्लामसलत करील.
निवडणूक पद्धतीत सुधारणा
नवी दिल्ली – निवडणूक पद्धतीत सुधारणा करण्याविषयीही एक सर्वसमावेशक विधेयक मांडण्याचा सरकारचा विचार आहे. प्रतिनिधीस परत बोलाविण्याचा हक्क, मतदानासाठी आवश्यक असलेला किमान वयोमर्यादा 21 वरून 18 वर आणणे, उमेदवाराच्या प्रचार खर्चातील काही भाग सरकारने देण्याची शक्यता इत्यादी मुद्द्यांवर विचारविनिमय चालू आहे.