पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहन चालकांच्या सोयीसाठी सांगवीमध्ये मुळा नदीवर पिंपरी आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुल उभारण्यात येत आहे. या सांगवी-बोपोडी पुलाचे काम अंतिम टप्यात आहे. या पुलाचे काम झाल्यानंतर वाहन चालकांना पुण्याकडे जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नोकरदार, शिक्षणासाठी विद्यार्थी, कामगारांसह व्यावसायिक विविध कामासाठी पुणे शहरात दररोज ये-जा करतात. पुण्यात जाण्यासाठी प्रामुख्याने दापोडीतील हॅरिस ब्रिज आणि औंध मार्गे प्रवेश करता येतो. मात्र, वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे सांगवी परिसरात सांगवी-बोपोडी असा पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम पिंपरी आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या कामासाठी 32 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. यामधील 16 कोटी पिंपरी आणि 16 कोटी पुणे महापालिका खर्च करत आहेत. कामाची मुदत जानेवारी 2024 पर्यंत आहे.
याबाबत स्थापत्य प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले, सांगवी-बोपोडी पुलाचे काम जलदगतीने सुरू आहे. आत्तापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी 2024 पर्यंत कामाचा कालावधी आहे. हा पुल पूर्ण झाल्यानंतर नवी सांगवी, सांगवी भागातील नागरिकांना पुण्यात जाणे सोईचे होणार आहे.