सातारा – “”तुम्ही चर्चेला तयार राहा. मी तुमच्यावरील गुन्हे मागे घ्यायला लावतो. यासंदर्भात येत्या दोन- तीन दिवसात तातडीची बैठक घेतली जाईल. जो अनुचित प्रकार घडला त्यासंबंधी निश्चितच चौकशी होईल, असे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी जालना येथील अंतरवाली सराटी या गावात उपोषणासाठी बसलेल्या आंदोलकांना दिले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी या गावात मनोज जिरंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी शांततामय मार्गाने आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर शुक्रवारी केलेल्या लाठीमारामध्ये दोन महिलांसह 23 जण जखमी झाले. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन थेट जालना येथे धाव घेतली. या गावात जाऊन आंदोलकांशी त्यांनी संवाद साधला. अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांची चौकशी केली आणि लवकर बरे व्हा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना उदयनराजे म्हणाले, “”तुम्ही चर्चेला तयार राहा. मी गुन्हे मागे घ्यायला लावतो.” जरांगे पाटील यांनी घडलेला सर्व प्रकार उदयनराजे यांना कथन केला. “राजे, तुम्ही सांगितले तर मी आंदोलन मागे घेईल आणि घरी जाईन,’ असे ते म्हणाले. उदयनराजे त्यांना म्हणाले, “”माझा स्वभाव तुम्हाला माहित आहे. मी कोणालाही घाबरत नाही. पण या गोष्टी चर्चेशिवाय सुटणार नाहीत.” आपण गुरांनाही इतकं मारत नाही, लाठीचार्जचा आदेश देणाऱ्याला निलंबित करायला लावणार, अशी हमी त्यांनी दिली.
“लाठीमाराचा प्रकार अत्यंत अनुचित आहे. या प्रकरणामागील सत्य लवकरच शोधून काढले जाईल. लाठीचार्ज करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत आपण सूचना करू, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळायला हवे. खरंतर हे फार पूर्वी व्हायला हवे होते. ज्यावेळी अशा प्रकारचा अन्याय होतो तेव्हाच उद्रेक होण्याची भीती असते.
आपण सर्वांनी शांततेत आणि संयमाने ही भूमिका घ्यावी,” असे आवाहन उदयनराजे यांनी केले. मराठा आरक्षणासंदर्भात 57 महामोर्चा झाले. मात्र, अनुचित प्रकार घडला नाही, मराठा समाज सहन करतो याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करावे असे नाही. गायकवाड कमिशनमध्ये ज्या थोड्या फार चुका होत्या, त्या दुरुस्त करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावे, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.
लाठीमाराचा आदेश दिला त्या येथील डीएसपींचा मी निषेध करतो, असेही उदयनराजे म्हणाले. उदयनराजे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा आंदोलन स्थळी उपस्थित होते. उदयनराजे यांच्या भूमिकेचे शरद पवार यांनी कौतुक केले.