मुंबई – राजकीय नेत्यांना घाम फोडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांची नुकतीच भेट झाली. दमानिया यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर रोहित पवारही सातत्याने अजित पवारांवर निशाणा साधत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे राज्यात आरोपांचा एक नवा बॉम्ब फुटणार की काय? अशी चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अंजली दमानिया नाव नवे नाही. त्यांनी काही नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप केले. पण नंतर या आरोपांची हवा निघाली. अंजली दमानिया यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले. दमानिया यांनी गडकरींना लोकसभा निवडणुकीत आव्हानही दिले. पण त्यात त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर 2015 मध्ये दमानिया यांनी आपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता दमानिया पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित पवार व दमानिया यांची सहकार मंत्री अतुल सावे यांच्या बंगल्याबाहेर भेट झाली. यावेळी त्याच्यात 10 मिनिट गप्पा रंगल्या. राष्ट्रवादीतील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घडल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.आम्ही चुकलो तर आमचीही वाजवा, अशी मिश्किल टिप्पणीही यावेळी रोहित पवारांनी अंजली दमानिया यांना उद्देशून केल्याची माहिती आहे. यामुळेही राजकीय वर्तुळात आता आरोपांचा कोणता नवा बॉम्ब फुटणार? कोणता राजकीय नेता अडचणीत येणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
पवारांसोबत ठामपणे उभा
दुसरीकडे, रोहित पवार यांनी पुन्हा एकदा आपण शरद पवारांसोबत ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, एखादा थोर व्यक्ती संघर्ष करत असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत उभे राहणार की सोडून जाणार? मी माझी भूमिका बदलली नाही.