पुणे : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावातील शाळेसाठी स्कूल बस भेट दिली आहे. या बसमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठीचा प्रवास सुरक्षित होणार असून या भेटीबद्दल लोणी धामणी ग्रामस्थांनी पुनीत बालन यांचे आभार मानले आहेत.
‘इद्रांनी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून लोणी धामणी गावात अनेक विकासकामे सुरू आहेत. या गावातील शाळेची भव्य अशी इमारत फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येत असून लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गावातील नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याचे तळेही बांधण्यात आले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.
याशिवाय गतवर्षी पुनीत बालन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या गावाला रुग्णवाहिकाही भेट दिली होती. त्यामुळे गावातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त शाळेसाठी आवश्यक असलेल्या बसच्या रक्कमेचा धनादेश लोणी धामणी गावातील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीला सुपूर्द केला. काही दिवसातच ही बस प्रत्यक्षरित्या विद्यार्थांना मिळणार आहे. हा धनादेश स्वीकारताना गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, समन्वयक चेतन लोखंडे, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज, खजिनदार बाळासाहेब गायकवाड, सचिव डॉ. अविनाश वाळुंज, सदस्य राजेश वाळुंज हे उपस्थित होते.