पुणे – महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मात्र, या पुलाच्या कामात संतोष हॉल चौकात तांत्रिक अडचण असल्याचे कारण देत या ठिकाणी जवळपास महिन्याभरापासून काम थांबविण्यात आले आहे. मात्र, ही अडचण काय याची माहिती पालिका प्रशासनास नसल्याने सोमवारी या कामाची पाहणी केली जाणार आहे. या चौकात एका गर्डरचे काम महिन्याभरापूर्वी पूर्ण करण्यात आले तर दुसरा गर्डर अर्धवटच सोडण्यात आला.
हे काम रखडल्याने या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेकडून राजारामपूल ते फनटाईम सिनेमागृहापर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, संतोष हॉल चौकात तांत्रिक अडचण आल्याने या भागात काम बंद ठेवण्यात आल्याने या ठिकाणी पुलाचे काम चुकल्याचे कुजबुज आहे.
प्रशासन म्हणते माहिती नाही…
महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनाही काम बंद असल्याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. काम का बंद आहे? याबाबत त्यांनी आधी पुलाचे काही भागाचे कॉंक्रीट तपासणीसाठी दिले आहे, असे कारण दिले. मात्र, ज्या ठिकाणी काम बंद आहे तेथे गर्डरचे कॉंक्रीटच अद्याप भरलेले नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले असता अधिकाऱ्यांनाही काही सांगता येईना. मात्र, येत्या सोमवारी पुलाच्या कामाचा दौरा करणार असून त्यानंतरच माहिती देणे शक्य असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
काम रखडल्याने वाहतूक कोंडी
पुलाच्या कामासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेने संतोष हॉलकडून सनसिटीकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावरील दोन्ही गर्डरचे काम दिड महिन्यांत करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, अर्धवट काम झाल्याने सनसिटीकडे जाणाऱ्या वाहनांना 150 मीटर पुढे जाऊन वळसा मारून यावे लागत आहे. त्यातच पुलाच्या कामासाठी जागोजागी बॅरीकेड असल्याने रस्ता आधीच अरूंद आहे. परिणामी, या ठिकाणचे काम आधी पूर्ण करावे, अशी मागणी असतानाही हेच काम रखडले आहे.