पिंपरी – शहरातील विद्यार्थ्यांनी संशोधनात मोठा टप्पा गाठला आहे. क्षमतेपेक्षा तिप्पट अधिक वजन उचलणारे ड्रोन त्यांनी तयार केला आहे. दुर्गम भागात मदत पोहचविण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा ड्रोन बनविला आहे. चार किलो वजनाचा हा ड्रोन 12 किलोपर्यंत वजन उचलू शकतो. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत या ड्रोनने प्रथम क्रमांक पटकविला आहे.
इर्शाळवाडी गावामध्ये नुकतीच दुर्घटना घडली होती. माळीणप्रमाणे संपूर्ण इर्शाळवाडी गाव ढिगाऱ्याखाली दाबले गेले होते. हे गाव दुर्गम ठिकाणी वसलेले होते. यामुळे मदत आणि बचावकार्य करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या भागात औषधे किंवा काही साहित्य घेऊन जाण्यासाठी अनेक संकटे आलीत. तसेच संरक्षण विभागातील जवानही अशाच दुर्गम ठिकाणी सीमेवर कार्यरत असतात. त्यांना मदत मिळणे गरजेचे असते.
चेन्नईत “सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर इंडिया’ तर्फे साउथर्न सेक्शन ड्रोन डेव्हलपमेंट चॅलेंज स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा उद्देश कमी वजनाचा ड्रोन बनवले होतो. हा ड्रोन जास्तीत जास्त वजन नेण्यासाठी सक्षम हवा होता. संकटसमयी वैद्यकीय साहित्य वाहून नेणे आणि संरक्षण दलास उपयुक्त ठरणे असा उद्देश या ड्रोनचा हवा होता. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या ड्रोनने 12 किलो वजन उचलून दाखवले. यामुळे 81 जण सहभागी झालेल्या या संघात ते प्रथम आले. या संघाला रोख रकमेचे बक्षीस मिळाले.
महाविद्यालयातील प्रा.चंदन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे ड्रोन तयार करण्याचे काम झाले. या टीममध्ये मिहीर झांबरे, अनिकेत पिंगळे, रिफा अन्सारी, पार्थ देशमुख, अपूर्वा परदेशी, ओम बाजपेयी, रोहन गायकवाड, साक्षी कुडके, वैष्णवी खिलारी, ओम दुर्गे, रोहित तांबडे, सुजय अंबाडकर, प्रणाली मगदूम, खुशी ठोके, तन्मय राजपूत, तृप्ती बावनकर, वेदांत भारसाकळे, आदित्य पाटील, शर्वरी साळोख, महेश्वर ढोणे यांचा समावेश होता.
पुणे शहरातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकताच एक रोबो तयार केला होता. आगीवर नियंत्रण मिळणाऱ्या या रोबोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतूक केले होते. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडीमधील विद्यार्थ्यांनी ड्रोन बनवून दाखवला आहे.
लष्कर, दुर्गम भागासाठी उपयुक्त
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांना वाव मिळण्यासाठी पूरक वातावरण आहे. या जोरावर महाविद्यालयाने अनेक प्रयोगांचे पेटंट दाखल केले आहेत. आपल्या वजनाच्या तिप्पट वजन उचलणाऱ्या ड्रोनचा वापर लष्कर, दुर्गम भागात मदत पोहोचविण्यासाठी होऊ शकतो.
चेन्नई : पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपल्या संशोधन ड्रोनसह.