पुणे – सनी स्पोर्टस किंगडम, सोमेश्वर फाउंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै विनायक निम्हण स्मृती करंडक 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेत 13 वर्षाखालील गटात यूकेएम कोथरूड एफसी संघाने तर, 15 वर्षाखालील गटात रायजिंग पुणे या संघांनी विजेतेपद संपादन केले.
सनी स्पोर्टस, पाषाण रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 13 वर्षाखालील गटात अंतिम लढतीत ऋषभ कनोजे (4 मि.), कार्तिकेय रेड्डी (16 मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर युकेएम कोथरूड एफसी संघाने एसपीजे क्लबचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
15 वर्षांखालील गटात अंतिम फेरीच्या सामन्यात रायजिंग पुणे संघाने एसपीजे क्लब संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान मिळवला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये विजयी संघाकडून ऋषित दास, आरव संचेती, विहान घाणेकर यांनी गोल केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सनी स्पोर्टस किंगडमच्या संचालिका मधुरा निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव अभिजीत मोहिते, क्रिडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव आणि ब्रीज सिंग आदी उपस्थित होते.