पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवर आत्तापर्यंत 82 हजार 453 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही शाळांमधील 19 हजार 394 प्रवेशाच्या जागा रिक्तच पडल्या आहेत. “आरटीई’अंतर्गत राज्यात यंदा 8 हजार 824 शाळांमध्ये प्रवेशाच्या 1 लाख 1 हजार 847 जागा दर्शविण्यात आल्या होत्या. यासाठी 3 लाख 64 हजार 413 बालकांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले होते.
लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यातील 63 हजार 933 बालकांचे प्रत्यक्षात शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले. प्रतिक्षा यादीत 81 हजार 129 बालकांचा समावेश करण्यात आला. आता सध्या प्रतिक्षा यादीतील चौथ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू आहे. प्रतिक्षा यादीतील पहिल्या फेरीत 25 हजार 898 बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यातील 13 हजार 660 बालकांचेच प्रवेश झालेले आहेत. प्रतिक्षा यादीतील दुसऱ्या फेरीत 8 हजार 834 बालकांपैकी 3 हजार 583, तिसऱ्या फेरीत 3 हजार 374 बालकांपैकी 1 हजार 259 बालकांचे प्रवेश झालेले आहेत. चौथ्या फेरीत 1 हजार 575 बालकांना प्रवेश जाहीर झाले आहेत.
पुण्यात 1,544 जागा रिक्तच
पुणे जिल्ह्यात “आरटीई’ अंतर्गत 935 शाळांमध्ये 15 हजार 596 जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यासाठी 77 हजार 531 अर्ज दाखल करण्यात आले होते. लॉटरी व प्रतिक्षा यादीतून 22 हजार 523 बालकांना प्रवेश जाहीर झाले होते. त्यातील 14 हजार 52 बालकांनी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. लॉटरीद्वारे 15 हजार 501 बालकांची निवड झाली होती. त्यातून 10 हजार 679 बालकांचे प्रवेश झाले. प्रतिक्षा यादीतून 7 हजार 22 बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.