वाघोली – शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पुन्हा एकदा वाघोलीमधील विविध समस्यांबाबत लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. यात आमदार अशोक पवार यांनी यावेळी सांगितले की, शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली गावात ०३ लाख ५० हजार इतकी लोकसंख्या आहे. याठिकाणी एक आयव्ही इस्टेट रोड, बकोरी रोड व फुलमळा रोड आहे. ज्याठिकाणी २५- २५ हजार लोक राहतात व ६- ६ हजार फ्लॅट आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी जायला फक्त १० फुटांचा रस्ता आहे. अशा विकासकांना पीएमआरडीएकडून परवानगी देण्यात येते. या परवानग्या कोणी दिल्या? असा प्रश्न निर्माण होतो. यामध्ये काही गैरव्यवहार झाला आहे का? अशी शंका निर्माण होते. यावर शासनाने न्याय द्यायला हवा व रस्त्यांच्या त्रासातून लोकांची सुटका करायला हवी. यासह विविध प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले.
सार्वजनिक जागांचा प्रश्न –
पीएमआरडीएकडे सार्वजनिक विकासाच्या जागा उपलब्ध असूनही त्या पीएमसीकडे का दिल्या जात नाही? डीपी प्लॅनची वाट का पाहिली जाते? डीपी प्लॅन हा वेळेतच झाला पाहिजे. तेव्हाच वाघोली गावच्या लोकांच्या समस्या सुटतील.
एमएसईबीचे सबस्टेशन –
मोठे गाव असताना त्याठिकाणी २२० केव्हीचे एमएसईबीचं सबस्टेशन पाहिजे. त्याच्या जागेचा प्रश्न हा पीएमआरडीए व पीएमसीने सोडवला पाहिजे.
पोलिस ठाण्याचा प्रश्न –
गावात पोलीस स्टेशन नाही, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या ठिकाणी पोलीस ठाणे मंजूर व्हावे.
सांडपाण्याचा प्रश्न –
सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी काही उपाययोजना नाही, गावाला एसटीपीची सोय हवी.
घनकचरा प्रकल्प उभारण्याची गरज –
तसेच गावात घनकचरा प्रकल्प उभे राहणे गरजेचे आहे.
त्यांच्यासाठी घरे बनवावित –
याठिकाणी जवळपास १०० एकराची झोपडपट्टी वसाहत आहे. मुंबईप्रमाणेच वाघोली गावातही काही योजना आणून चांगली घरे बनवावी.
पाणी प्रश्न मार्गी लावावा –
याठिकाणी ३७५ हौसिंग सोसायट्या आहेत. येथील लोकांना टँकरसाठी दरमहा १५ कोटी रु. खर्च करावे लागतात. एका वर्षात १८० कोटी रु. जर सामान्य माणसाला खर्च करावे लागत असतील तर त्यांना न्याय कोण देणार, त्यामुळे तातडीने पाणी प्रश्न सोडवण्यात यावा.
वाहतुकीचा प्रश्न –
वाघोली ते शिरूर उड्डाणपुलासाठी काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणे गरजेचे आहे. तसेच रिंग रोडचा देखील प्रश्न मार्गी लावून वाघोलीकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्याची मागणी केली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे विशेष लक्ष –
वाघोली मधील अनेक समस्यांच्या बाबतीत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना वाघोली मधील अनेक प्रश्नांची माहिती असल्याने त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत केली आहे. वाघोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात तसेच ट्रॉमा सेंटर या ठिकाणी मंजूर करण्यासाठी सावंत यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
त्यांचा ही पाठपुरावा वाघोलीसाठी लक्षवेधी ठरतोय –
माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, वाघोली चे माजी उपसरपंच संदीप सातव, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, टीम वाको (टीम वाघोली अगेन्स्ट करप्शन), सोसायटी मधील नागरिकांची वासा संघटना तसेच इतर ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्था यांनी वाघोली मधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर सुरू केलेला पाठपुरावा आजही वाघोलीकरांसाठी लक्षवेधणारा ठरत आहे.