नगर – एसटीचा प्रवास करताना आता खिशात अथवा पर्समध्ये रोख रक्कम नसली, तरी चिंता करायचे कारण नाही. कारण, बदलत्या काळासोबत पावले टाकत एसटी महामंडळानेही प्रवाशांना तिकीट देण्यासाठी नवीन ऍड्रॉंईड मशिन आणली आहेत. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईनच तिकिट काढता येणार आहे.
राज्यात तब्बल 34 हजार वाहकांना नवीन ऍड्रॉंईड तिकीट इशू मशिन येत्या महिनाअखेरपर्यंत देण्यात येतील.त्यामध्ये एटीएम, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, यूपीआय, क्यूआर कोड वापरून एसटी तिकिटाचे पैसे देण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांची सोय होणार आहे.सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिजिटल व्यवहाराला चालना देण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. मोबाईलवरून डिजिटल पेमेंट करणे सोपे असल्याने आता रोख व्यवहार कमी झाले आहेत. एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना तसेच वाहकांनाही सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण होते. अशावेळी वाहकाबरोबर वादावादी, सुट्या पैशांसाठी तिकिटावर लिहून देऊन पुन्हा पैसे घेणे, एसटीतून खाली उतरताना तिघा-चौघात एकत्रित पैसे देणे यासह अन्य प्रकार घडत असतात. त्यामुळे प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. बदलत्या काळानुसार एसटीची सेवाही बदली आहे.
त्यानुसार आता एसटीमध्येही तिकिटाच्या पैशासाठी ऍड्रॉंईड मशिन देण्यात येणार आहेत. त्या मशिन मिळण्यासाठी एसटी महामंडळाने ईबिस्कॅश या कंपनीशी करार केला आहे. त्यांच्याकडून येत्या महिनाभरात तब्बल 34 हजार वाहकांना नवीन ऍड्रॉंईड आधारित डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशिन्स देण्यात येईल. त्या मशिनद्वारे आता प्रवासादरम्यान खिशात पैसे नसतानाही प्रवाशांना डिजिटल पेमेंट करून प्रवास करता येणार आहे. राज्यभरातील सर्व एसटी डेपोंतील वाहकांना मशिन देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या नवीन मशिनमध्ये एटीएम, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करून एसटीच्या तिकिटाचे पैसे ऑनलाइन देता येतील, त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
जिल्ह्यासाठी 1438 मशिन
एसटी महामंडळाकडे नवीन कंपनीच्या करारानुसार 34 हजार वाहकांना नवीन ऍड्रॉंईड मशिन देण्यात येतील. त्यामध्ये अहमदनगरसाठी 1438, सातारा 1702, सांगली 1674, कोल्हापूर 1752, सोलापूर 2058, नांदेड 1290, बीड 1172, परभणी 1024, पालघर 1113, रत्नागिरी 2029, जळगाव 1986, पुणे 1720, वर्धा 599, रायगड 951, सिंधुदुर्ग 953, अमरावती 1058, नाशिक 2228, नागपूर 1082, मुंबई 202, ठाणे 1652.