आंबेगाव – पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर आंबेगावातील सर्वात जुन्या 1990 मध्ये सुरू झालेल्या अंगणवाड्यांकडे जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अंगणवाड्यांची मोठी दुरवस्था झाली होती. याबाबत सातत्याने गेली तीन वर्षे निधीची मागणी करूनही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने अखेर आंबेगावचे माजी उपसरपंच अनिल कोंढरे यांनी पुढाकार घेत अंगणवाडी क्र.1ची दुरुस्ती स्वखर्चातून केली आहे.
आंबेगावातील या अंगणवाडीच्या भींतीवर पाणी गळती लागली होती. शिवाय सतत येणाऱ्या पाण्याने भींती खचल्या होत्या. अंगणवाडीत अक्षरशः पाणी वाहत होते. त्यानंतर दोन वर्षे अंगणवाडी क्र.1 चे इतर केंद्रात तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. शालेय आहारही तेथेच दिला जात होता. परंतु, त्याही केंद्रात जागेअभावी मुलांचे हाल होऊ लागले होते. त्यामुळे ही अंगणवाडी गावठाणातील समाज मंदिरात भरविली जावू लागली. अंगवाडीची दुरूस्तीची मागणी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेकडे केली होती.
परंतु, अंगणवाडीची दुरूस्ती महापालिका करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अखेर, अंगणवाडी सेविका शालन शेंडे यांनी अनिल कोंढरे यांच्याकडे याबाबतची माहिती दिल्यानंतर कोंढरे यांनी स्वखर्चातून नवीन पत्रे, रंगरंगोटी, वीजेची व्यवस्थाही, दोन पाण्याच्या टाक्या आदी कामे केली. याचे लोकार्पण बालविकास प्रकल्प अधिकारी, पुणे दक्षिण पश्चिम प्रकल्प निलिमा कोरे यांच्यासह दादासाहेब कोंढरे, संतोष ताठे, दिनेश कोंढरे, दिपक बेलदरे, दत्ता बेलदरे, सुरेश टेळे आदीच्या उपस्थितीत करण्यात आले.
गावातील सर्वात जुन्या अंगणवाडीच्या दुरूस्तीबाबत ग्रासपंचायत काळापासून आम्ही निधीसाठी पाठपुरावा करीत होतो. परंतु, जि.प.कडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच गावा महापालिकेत समाविष्ट झाल्याने ही समस्याच मागे पडली. अंगणवाडीची मोठी दुरवस्था झाल्याची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिल्याने अखेर स्वखर्चातून शाळेचे काम केले, असे आंबेगाव बुद्रुकचे माजी उपसरपंच अनिल कोंढरे म्हणाले.