पुणे : पुणे शहर पोलीस दलातील अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी जीवाची बाजी लावून राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) हव्या असलेल्या इम्रान खान आणि युनुस साकी या दोन्ही दहशतवाद्यांना मंगळवारी
बेड्या ठोकल्या. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी, अंमलदार प्रदीप चव्हाण, अमोल नाझन, बाला शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांचा पोलीस आयुक्त कार्यालयात सत्कार करण्यात आला. पुणे पोलीस आपले कर्तव्य बजावण्यासाठी सक्रिय आणि तत्पर असतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.
हे दोन्ही दहशतवादी आयसिस या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंध असलेल्या सुफाशी संबंधित होते, त्यांचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून घेत होते. प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पुण्याचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भारतीय जनता किसन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.