मुंबई – अभिनेता सनी देओल सध्या ‘गदर 2’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी तो गदर चित्रपटामधील तारा सिंगच्या लुकमध्ये दिसून आला. या चित्रपटाबाबत त्याने अनेक खुलासे केले आहे.
‘गदर एक प्रेम कथा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा आम्हाला माहित नव्हते की चित्रपट इतका हिट होईल. लोक म्हणायचे की हा पंजाबी चित्रपट आहे, त्याला हिंदीमध्ये डब करा. काही चित्रपट वितरकांनी आम्ही हा चित्रपट खरेदी करणार नाही असं ते म्हणाले होते. त्यामुळे आम्हाला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. पण लोकांना हा चित्रपट इतका आवडला की नंतर सर्वांचं तोंड बंद केले,’ असे सनी देओल म्हणाला.
गदर 2 रिलीज होण्यापूर्वी ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट पुन्हा एकदा 9 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. अवघ्या तीन दिवसांत ‘गदर’ने 1.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. यावरून आजही गदरची क्रेझ प्रेक्षकांमध्ये असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर 2’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ रिलीज होऊन जवळपास 17 वर्षांनंतर निर्माते ‘गदर 2’ लोकांसमोर आणत आहेत. ‘गदर 2′ चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, जो ‘गदर: एक प्रेम कथा’ मध्ये बालकलाकार होता. मात्र ‘गदर 2’ मध्ये तो आता नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.