नवी दिल्ली : इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी तिरुपती बालाजी चे दर्शन घेतले आहे. या जोडप्याने भगवान बालाजी मंदिरासाठी मोठी देणगी दिली आहे. नारायण मूर्तींनी सपत्नीक तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य ए. व्ही. धर्मा रेड्डी यांना ‘सोन्याचा अभिषेक शंख’ आणि ‘कासव’ देणगी म्हणून सुपूर्द केले. त्यांनी केलेले हे सोन्याचे दान तब्बल दोन किलो पेक्षा जास्तअसल्याचे सांगितले जात आहे.
सुधा मूर्ती यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या सदस्या होत्या. मूर्ती दाम्पत्याने सोन्याचा शंख आणि ‘कासव तिरुपती बालाजी मंदिराला दान केले. या दान केलेल्या वस्तूंचे वजन सुमारे 2 किलो आहे. या खास प्रसंगी दोघेही मंदिराच्या रंगनायकुला मंडपममध्ये गेले होते. मूर्तींनी याआधी देखील तिरुपती बालाजी मंदिराला देणग्या दिल्या आहेत.
तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट बोर्डाच्या माजी सदस्या आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी यापूर्वी देखील मंदिराला सोन्याच्या अभिषेक शंखाचे दान केले होते.
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी दान केलेल्या ‘अभिषेक शंखा’ची रचना खास पद्धतीने करण्यात आली आहे. शंखाचे तोंड एका बाजूने खुले आहे. याशिवाय मूर्ती दाम्पत्याने ‘कूर्म’ अर्थात कासवही दान केले आहे. या दोन्हींचा उपयोग स्वामी अम्मावारांच्या अभिषेकात केला जातो. कूर्माचा पाठीचा भाग रिकामा ठेवण्यात आला आहे, जो शंख ठेवून भरला जातो. मूर्ती दाम्पत्याने केलेल्या या दानाला ‘भुरी’ दान असंही म्हणतात.