नवी दिल्ली :- भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केलेल्या कुस्तीपटूंची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी स्वतंत्र चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, तरीही संघ घोषित करण्यापूर्वी खुल्या चाचणी स्पर्धेतील कामगिरीही ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या कुस्तीपटूंना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरीही पात्रतेसाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा तोंडावर आलेली असताना विविध वजन गटातील कुस्तीपटूंच्या खुल्या चाचण्या 22 आणि 23 जुलै रोजी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर स्टेडियमवर होणार आहेत. साधारणपणे, अशा चाचण्यांमधील विजेत्यांची निवड होत असते. मात्र, यावेळी तसे होणार नसल्याने कुस्तीपटू नाराज झाले आहेत.
खुल्या चाचण्या जिंकूनही कुस्तीपटू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेनुसार, सध्या भारतीय कुस्ती संघटनेचे कामकाज पाहात असलेल्या हंगामी समितीने 6 आंदोलक कुस्तीपटूंना चाचणीतून सूट दिली आहे. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान या कुस्तीपटूंची स्वतंत्र चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये ते खुल्या चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कुस्तीपटूंशी स्पर्धा करतील.
यात ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंचा समावेश आहे. ही चाचणी पार पडल्यावर येत्या 23 जुलै रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंची नावे जाहीर करण्यात येणार आहे.
महासंघावर असलेली समिती खुल्या चाचण्यांच्या आधारे संघाची निवड करेल आणि आंदोलनात सहभागी झालेल्या कुस्तीपटूंची नावे राखीव म्हणून ठेवतील. यानंतर 10 ऑगस्ट रोजी खुल्या चाचणीत चांगली कामगिरी करणारे खेळाडू व राखीव गटातील खेळाडू यांच्यात सामने होणार आहेत. त्यातून अंतिम संघ जाहीर केला जाणार आहे.