लॉस एंजेलिस – हॉलिवूडमधील चित्रपट लेखकांच्या मागण्यांना कलाकारांनीही पाठिंबा दिला असून आता ही मंडळी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. गेल्या 63 वर्षांमध्ये हॉलिवूडमध्ये प्रथमच संप केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पट आणि टिव्ही कार्यक्रमांची निर्मिती थांबू शकते.
मानधनाच्या मुद्यावरून सुरू असलेला हा तिढा सोडवण्यासाठी बुधवारी रात्रीपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. मात्र या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही. त्यामुळे “द स्क्रीन ऍक्टर्स गील्ड’ या कलाकारांच्या संघटनेने हा संपाचा इशारा दिला आहे. या संघटनेमध्ये हॉलिवूडमधील तब्बल 1 लाख 60 हजार कलाकार सहभागी आहेत.
कमी होत जाणाऱ्या मानधनाबरोबर “आर्टिफिशियल इंटिलिजन्स’मुळे सिनेसृष्टीतील संधी कमी होण्याची भीती देखील या कलाकार मंडळींनी व्यक्त केली आहे. चर्चेतून कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे कलाकारांच्या संघटनेने राष्ट्रीय पातळीवरील कमिटीकडे संपाची शिफारस केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील कमिटीकडून या मुद्यावर आज (गुरूवार) सकाळी मतदान घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
हे मतदान दोन मुद्यांवर केले जाणार आहे. हॉलिवूडमधील लेखक मंडळींनी 11 आठवड्यांपूर्वीच संपाचा इशारा दिला आहे. कलाकारांबरोबर लेखकांनीही संप पुकारल्यास हा संप हॉलिवूडच्या इतिहासातील 1960 पासूनचा आतापर्यंतचा पहिला कडकडीत संप ठरू शकतो.
हॉलिवूडमधील लोकप्रिय टिव्ही मालिका या वर्षी प्रसारित होण्यास सुरुवात होणार आहे. या मालिकांच्या निर्मितीचे काम संपामुळे रखडू शकते. जर संप दीर्घकाळ सुरू राहिला तर हॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपटांचे प्रदर्शन देखील लांबणीवर पडू शकते.
अधिक सरस मानधन आणि “आटिफिशियल इंटिलिजन्स’च्या वाढत्या वापरामुळे रोजगारावर होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण मिळण्याची मागणी लेखक आणि कलाकार करत आहेत. मनोरंजन विश्वामध्ये झालेल्या अमूलाग्र बदलांच्या परिणामांना मनोरंजन उद्योगातील बड्या बॅनरनी अद्याप स्विकारलेले नाही.
स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या रोजंदारीतील अर्थकारणावर अवलंबून राहता येऊ शकत नाही, असे कलाकारांच्या संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
बुधवारी, दिग्दर्शक, पडद्यामागील चित्रपट कामगार आणि लेखकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हॉलिवूड युनियनने कलाकारांना पाठिंबा दिल्याचे निवेदन जारी केले.
मात्र संघटनेचा हा निर्णय निराश करणारा असल्याचे चित्रपट आणि टिव्ही कार्यक्रमांच्या निर्मात्यांच्या संघटनेने म्हटले आहे. हा तिढा सोडवण्यासाठी निर्मात्यांनी फेडरल मध्यस्थांना मध्यस्थी करण्याचे आवाहन देखील केले आहे.
अब्जावधी डॉलर कमावून देणाऱ्यांना मिळते काय?
चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर तो किती दिवस चालला आणि चित्रपटाने किती धंदा केला हे समजू शकायचे. आता “ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर निर्मात्यांना किती फायदा मिळतो हे समजायला काही मार्ग नाही. हॉलिवूडचे सिनेमे जगभरात बघितले जातात. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवाद केले जातात.
यातून निर्मात्यांना सातत्याने अब्जावधी डॉलर मिळत राहतात. क्ट्यवधी प्रेक्षक त्याचा आनंद घेतात. मात्र पडद्यामागच्या कलाकारांना ठराविक मानधनाशिवाय काहीच मिळत नाही. महागाईचा सामना या कर्मचाऱ्यांनी कसा करायचा? असा प्रश्न संपाचा इशारा दिलेल्या संघटनेने म्हटले आहे.