पुणे -राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने मान्यता दिली आहे.
सामाजिक सुरक्षा अधिनियम
अंसघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती, उद्योग यांसह आर्थिक क्षेत्रात असंघटित कामगारांचे योगदान मोठे आहे. केंद्र शासनाने असंघटित कामागारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने 31 डिसेंबर 2008 रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारित केला आहे.
राज्यात साडेतीन कोटी कामगार
चंदीगड येथील लेबर ब्यूरो यांनी सन 2014 मध्ये जाहीर केलेल्या चौथ्या वार्षिक रोजगार-बेरोजगारी सर्वेक्षणानुसार राज्यात तीन कोटी 65 लाख 25 हजार 149 असंघटित कामगार आहेत. या असंघटित कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 च्या कलम 6 च्या तरतुदीअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केले आहे.
नोंदणी फक्त सव्वाकोटी जणांची
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय घेतला असून, असंघटित कामागारांची नोंदणी करण्याकरीता ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. 31 मे अखेर राज्यात ई-श्रम पोर्टलवर सुमारे एक कोटी 36 लाख 28 हजार असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. कामगार, कृषी, उद्योग, सेवा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्यांचा यात समावेश आहे.
क्षेत्रनिहाय मंडळे
या निर्णयानुसार क्षेत्रानुसार मंडळे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये शेती आणि शेतीपूरक उद्योग पशुपालन, डेअरी तसेच डेअरीपूरक व्यवसाय, व्यावसायिक वाहनचालक, घरेलू कामगार, विडी उत्पादन आणि पूरक व्यवसाय, हमाल कामगार, कापड उद्योग, शिक्षण तसेच पूरक व्यवसाय आदी 39 क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे.
39 मंडळे स्थापन करणार
- असंघटित कामगारांच्या व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार कल्याण मंडळे स्थापन करण्याची अनेकदा मागणी होत होती.
- वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याऐवजी सर्वसमावेशक एकच महामंडळ स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब.
- त्यामुळे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देणे योग्य होणार.
- महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ व त्या अंतर्गत उद्योग, व्यवसाय क्षेत्रनिहाय 39 मंडळे स्थापन करणार.