जम्मू – शुक्रवारी पहाटे येथील भगवती नगर छावणीतून वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पहिली तुकडी अमरनाथ मार्गावर रवाना झाली. या तुकडीला जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवला. या तुकडीत 3400 हून अधिक यात्रेकरू सहभागी झाले आहेत.
यात्रेकरूंना सीआरपीएफच्या जवानांनी एस्कॉर्ट केले होते आणि हायवेवर लष्कर आणि पोलिसांचा जागता पहारा आहे. यात्रेकरूंसाठी यावेळी जय्यत सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेसाठी आतापर्यंत 3.5 लाख यात्रेकरूंनी नोंदणी केली असून ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यात्रेकरूंसाठी जम्मूमध्ये 33 निवास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत तर नोंदणी केंद्रांवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग जारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यात्रेकरूंच्या तात्काळ नोंदणीसाठी वैष्णवी धाम, महाजन सभा, पंचायत घर येथे पाच काउंटर आणि संतांच्या नोंदणीसाठी गीता भवन आणि राम मंदिर येथे दोन काउंटर स्थापन करण्यात आले आहेत. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्वोत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.