पुणे – सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च या संस्थेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला 18 जून पासून सुरुवात झाली. या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संभाजी भागाचे संघचालक अनिलजी व्यास तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनंत भूषण रानडे (ओन्कॉलॉजिस्ट कॅन्सर तज्ञ) व एस आर कुलकर्णी (प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व ग्राहक पेठ अध्यक्ष) उपस्थित होते .
याप्रसंगी डॉक्टर रानडे यांनी कॅन्सर या आजाराची व्याप्ती व आजाराने घातलेला समाजाला विळखा याबाबतची माहिती दिली. तसेच त्यासाठी अशा संस्थांची का गरज आहे याविषयी देखील त्यांनी प्रबोधन केले. मी व माझ्याबरोबर असलेले 40 डॉक्टरांची टीम तुमच्या कार्याला पुढे नेण्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला वक्ते म्हणून महेशजी पोहनेरकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगर सहकार्यवाह) लाभले होते. हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सावरकर अध्ययन केंद्र डेक्कन जिमखाना येथे पार पडला.यावेळी धनंजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले तसेच योगेश देशपांडे यांनी संस्थेच्या संकल्पना व उद्देश याविषयी माहिती दिली. संस्थेचा उद्देश मोठे कॅन्सर हॉस्पिटल उभारणे हा जरी असला तरी समाजात कॅन्सर याविषयी जनजागृती करणे हे संस्थेचे ध्येय आहे असं ते यावेळी म्हणाले.
महेशजींनी त्यांच्या भाषणामध्ये संघ विचारांना प्रेरित होऊन समाजामध्ये संघ स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला समाजामधील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच संघाच्या व इतर सेवाभावी संस्थाचे प्रमुख उपस्थित होते.