पुणे – दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने एका दुचाकीवरील दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत ते सराईत वाहनचोर असल्याचे निष्न्न झाले. त्यांच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात चार वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या ताब्यातून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या नागेश उर्फ रमेश बेडजंगम ( 20, रा. लोणी काळभोर ) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधाच्या अनुषंगाने गस्त घालत असताना पोलिस अंमलदार सुमित ताकपेरे व महेश पाटील यांना खबर मिळाली की दोन व्यक्ती हे मगरपट्टा कडून नोबेल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या ब्रिज खाली उभे असून त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचा संशय आहे. त्यानूसार पथकाने तेथे धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली.
त्यांना पोलीशी खाक्या दाखवताच त्यांनी मांजरी येथून गाडी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अधिक चौकशीत विमानतळ, येरवडा आणि आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयांतील दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. दोघांना पुढील तपासासाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड, राठोड, पोलीस नाईक येडे, लोखंडे, ढगे, तांजणे, जाधव, अंमलदार दगडे, ताकपेरे, पाटील, सातपुते, बनकर यांनी केली आहे.