बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामतीचा पद ग्रहणसमारंभ
बारामती – बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. शहर व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने सुरु असलेल्या विविध विकासकामांमध्ये बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनीही योगदान द्यायला हवे, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष सचिन देशमुख, उपाध्यक्ष सुनील मुंदडा, राज्यातील एकमेव महिलाध्यक्षा नीलीमा पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष उध्दव गावडे, मावळते अध्यक्ष विक्रांत तांबे, बारामती बॅंकेचे, अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी नवनिर्वाचित कार्यकारिणीमधील अध्यक्ष उद्धव गावडे, उपाध्यक्ष साहिल खत्री, सचिव आदेश वडूजकर, खजिनदार चंद्रकांत शिंगाडे, सहसचिव नितिश शहा, सदस्य- किशोर मेहता, मनोज पोतेकर, आशपाक सय्यद, सुनील देशमुख, दत्तात्रय बोराडे, सुशील जाधव, राजेंद्र खराडे, अविनाश लगड, दीपक काटे, दीपक मलगुंडे, शामराव राऊत, अविनाश सूर्यवंशी, चेतन वाल्हेकर, सुधीर शिंदे, दत्तात्रय रणवरे, ओंकार देवळे, सुशील घाडगे, संजय संघवी व विक्रांत तांबे यांनी पदाची शपथ घेतली.
अजित पवार म्हणाले, सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आज बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते, या क्षेत्राच्या माध्यमातून बारामतीत विविध विकासाच्या कामांना गती द्यायला हवी. बारामतीत नऊ एकर जागेवर प्रशस्त उद्यान विकसीत केले जाणार आहे, शहरातील सर्वांनीच विकासाच्या या कामात योगदान देण्याची गरज आहे.
बिल्डर असोसिएशनने एखादा रस्ता ताब्यात घेऊन तेथील जबाबदारी स्विकारायला हवी. बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक प्रकल्प हातात घेतले असून येत्या काही दिवसात बारामती अधिकाधिक सुंदर होईल. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले. उद्धव गावडे यांनी स्वागत केले.
एकटा पाचला उठून काय फायदा
मी पहाटे पाचला उठून कामाला सुरवात केली, तरी जो पर्यंत बारामतीकर सहकार्य करत नाहीत तोवर विकासकामांना म्हणावे असे यश मिळणार नाही. लोकसहभाग विकासकामात सर्वात महत्वाचा असतो असा अजित पवार यांनी स्पष्ट केले.