मुंबई – अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. विक्की आणि साराची धमाल प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे, याचा पुरावा म्हणजे चित्रपटाचे सतत वाढत जाणारे कलेक्शन.
शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तीन दिवसांत चित्रपटाचे कलेक्शन उत्कृष्ट झाले आहे. या चित्रपटाने निम्म्याहून अधिक बजेट काढले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
विक्की कौशल आणि साराचा हा चित्रपट शुक्रवारी 2 जून रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 5.49 कोटी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 7.20 कोटी तसेच, रविवारी सुमारे 8.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या तीन दिवसांचे कलेक्शन एकत्र केले तर ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने आतापर्यंत 21.19 कोटींची तगडी कमाई केली आहे.
‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे बजेट 40 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत तीन दिवसांच्या कलेक्शनवर नजर टाकली तर बजेटच्या निम्म्या खर्चात हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांत प्रदर्शित झाला आहे.
दरम्यान, हा चित्रपट सारा अली खान आणि विक्की कौशलचा पहिला चित्रपट आहे, ज्यामध्ये दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आहेत. चित्रपटात या दोन स्टार्सशिवाय नीरज सूद, राकेश बेदी आणि शरीब हाश्मी सहाय्यक भूमिकेत आहेत.