नवी दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचे या भेटीकडे लक्ष्य लागले आहे. 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करावा असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा 19 जून आधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारवर टीका देखील झाली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही नवोदित आमदार देखील मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन आमदारांना मंत्री पदाची संधी देण्यासाठी सध्याच्या मंत्रिमंडळातील काही आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता देखील आहे. काही मंत्रिमंडळातील चेहरे फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. अशातच आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुका असल्याने अशा चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून बाजूला सारून त्या जागी नवीन आमदारांना संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
आगामी निवडणूका एकत्रित लढणार
राज्यात आगामी सर्व निवडणूका शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या 11 महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत.
यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहा यांच्या भेटीनंतर व्यक्त केला.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. तो कधी होणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. तसेच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप राज्यात सर्व निवडणुका एकत्र लढतील, अशी चर्चा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत झाली.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री