पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज आपल्या मुळशीतील कार्यकर्त्यांना अतिशय कठोर शब्दांमध्ये दम दिल्याचं पाहायला मिळालं. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. लोकसभा आणि मनपा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील हजेरी लावली होती.
दरम्यान, या बैठकीनंतर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुळशीतील कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावत थेट कानाखाली लावेन… असा इशाराच दिला आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, “तुम्ही देखील कामं करायची आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिली आहेत. भांडायचं नाही.
नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेन, बाकी काही करणार नाही. यातून तुमची बदनामी होत नाही तर आमची बदनामी होते. शरद पवारांची बदनामी होते. हा कुठला फाजीलपणा चाललाय? मी पदाचा राजीनामा घेईन हा? मी फार टोकाचं वागेन मग…’ अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची आजची ही बैठक प्रामुख्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आली असून, यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात देखील करण्यात आली आहे.