पुणे ग्रामीण (मयुर भुजबळ) – तळेगाव ढमढेरे परिसरात दहशत निर्माण केलेला दुसराही बिबट्या आज अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला व तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांना यश आले आहे. या बिबट्याने तळेगाव ढमढेरे, धानोरे, विठ्ठलवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून आपले भक्ष्य केले होते . त्यामुळे सायंकाळी घराच्या बाहेर पडताना किंवा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी शेतात जाताना बिबट्याची परिसरात मोठी दहशत असल्याने शेतकरी व नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते.
तळेगाव ढमढेरे येथील चौधरी वस्ती,ढमढेरे वस्ती,भिमाशेत,साळूमाळी वस्ती तसेच धानोरे विठ्ठलवाडी या परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार नागरिकांना पाहायला मिळत होता. पहिला बिबट्या याच परिसरात दि.29 एप्रिल रोजी लावला होता.तर हा बिबट्या 21 मे रोजी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता.परंतु या परिसरात अजून दोन बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते त्यानुसार वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावण्याची सूचना वनकर्मचारी यांना दिल्या. त्यामुळे आज अखेर दुसराही बिबट्या वनखात्याच्या जाळ्यात अडकला नागरिकांचा भीतीने गुदमरलेला श्वास मोकळा झाला.
या संपूर्ण कार्यवाहीत शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर वनपरीमंडल अधिकारी गौरी हिंगणे,वनपाल प्रमोद पाटील ,वनरेस्क्यू टीम सदस्य शेरखान शेख, वनकर्मचारी बाबासो घोलप यांनी कार्यवाही केली. तर अमोल ढमढेरे,संतोष ढमढेरे,वैभव ढमढेरे,रामभाऊ ढमढेरे,भाऊ सोनवणे,सार्थक ढमढेरे,योगेश सोनवणे,तुषार ढमढेरे,अक्षय ढमढेरे आदित्य ढमढेरे,यश आल्हाट पिंजरा यांनी अथक प्रयत्न केले .
तर हा दुसरा बिबट्या जेरबंद झाल्यानंतर काही वेळातच याच शेतातून अजून एक बिबट्या बाहेर आल्याचे येथील शेतकऱ्यांना पाहायला मिळाले अशी माहिती अमोल ढमढेरे यांनी दिली. त्यामुळे याच परिसरात पिंजऱ्याची गरज असल्याचे ढमढेरे यावेळी म्हणाले.