मुंबई – मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ या चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. सरसेनापती हंबीरराव नंतर पुन्हा एकदा अभिनेता प्रवीण तरडे ऐतिहासिक भूमिका साकारताना यावेळी दिसणार आहे. ‘बलोच’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.
ट्रेलरवरूनच हा चित्रपट भव्य-दिव्य असणार याची कल्पना येते. प्रवीण तरडे यांचे मनाला भिडणारे संवाद, मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठीची तगमग यावेळी पाहायला मिळणार आहे. पानिपतच्या लढाईत पराभव झाल्यानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळणाऱ्या मराठ्यांची व्यथा सांगणारा आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट येत्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे व्यतिरिक्त अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दत्ता काळे, जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.