अकोले – जनावरांचा रस्ता अडवल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मोठ्या भावास दुसऱ्या भावाने झटापटी करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात खो-याने मारून खून केला. ही घटना अकोले तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी भाऊ व पुतण्यास अटक केली आहे.
याबाबत अकोले पोलिसांत मयताची पत्नी सोनाबाई मनोहर लेभें (वय ४०) रा.गोडेवाडी, केळी-कोतुळ ता.अकोले यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार फिर्यादी १६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतातील जनावरे दिर सुरेश सावळेराम लेंभे यांच्या रिकाम्या शेतातून घेऊन जात असताना ‘माझ्या शेतातून जनावरे घेऊन जायचे नाही’, असे म्हणून शिवीगाळ केली.
यानंतर काही वेळाने पती मनोहर सावळेराम लेभे हे कामावरुन घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला असता ते भाऊ सुरेश लेंभे याला घराचे मागे जाऊन जनावरांचा रस्ता अडवल्याचा जाब विचारला. त्याचा राग मनात धरून सुरेश लेभे याने मनोहर सावळेराम लेंभे याच्या अंगावर जाऊन झटापटी करुन शिवीगाळ केली.
त्यानंतर पुतण्या राजाराम उर्फ राहुल लेंभे हातात खोरे घेऊन आला आणि त्याने चुलता मनोहर लेंभे यांच्या डोक्यात तीन-चार वेळा मारुन खून केला. या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत भावाचा खून केल्याप्रकरणी भाऊ सुरेश लेंभे व पुतण्या राजाराम उर्फ राहुल लेंभे याच्याविरूद्ध गु.र.न. २३९/२३ भादवी कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक सुभाष भोये करत आहे.