मुंबई – बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांतने पुन्हा एकदा भारताचे नाव उंचावले आहे. वेदांतने एकाच स्पर्धेत स्विमिंगमध्ये एक-दोन नाही तर 5 गोल्ड मेडल्स जिंकले आहेत. त्याच्या या कामगिरीचे सध्या सर्वजण कौतुक करत आहेत. याआधी देखील वेदांतने अनेक मेडल जिंकले आहेत.
वेदांत माधवनने मलेशियामध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत भारतासाठी पाच सुवर्णपदके जिंकली. स्वत: आर माधवनने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून आपल्या मुलाच्या या यशाची माहिती दिली आहे. मलेशिया इनव्हिटेशनल एज ग्रुप जलतरण स्पर्धेत वेदांतने हे सुवर्णपदक जिंकले आहे. आर माधवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये वेदांत भारतीय ध्वज आणि त्याने जिंकलेल्या पाच सुवर्णपदकांसह पोज देताना दिसत आहे.
“देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांनी वेदांतने क्वालालंपूर येथे शनिवार व रविवारी आयोजित मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रूप चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतासाठी 5 सुवर्ण (50 मी, 100 मी, 200 मी, 400 मी आणि 1500 मी) पदके जिंकली. मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे,” असे माधवनने पोस्टमध्ये लिहिले आहे.
याआधी आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने डॅनिश ओपन 2022 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. वेदांतने 1500 मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धा जिंकली होती. तर मध्य प्रदेशमधील खेलो इंडिया युथ गेम्समध्येही वेदांतने पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकली होती.