ट्विटची मालकी उद्योगपती इलॉन मस्ककडे गेल्यापासून ट्विटरमध्ये सातत्याने वेगवेगळे बदल होत आहेत. त्यातही काही बदल असे आहेत ज्यांची अपेक्षाही कोणी केली नव्हती. आता मस्क यांनी ट्विटरची ओळख असलेला लोगोच बदलला आहे. प्रत्येक ब्रँडसाठी लोगो महत्त्वाचा असतो. तो कंपनीची ओळख असतो. मात्र, आता इथून पुढे ट्विटरवर उडत्या चिमणीच्या जागी लोगो म्हणून क्रिप्टोकरन्सी डॉज कॉइनवरील श्वानाचे चित्र असले.
डॉज कॉइन म्हणजे काय?
डोज कॉइन ही एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी 2013 मध्ये डोज कॉइन लाँच केले होते. त्यावर शिबा इनू या श्वानाचे चित्र आहे. विशेष म्हणजे बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीची खिल्ली उडवण्यासाठी डोज कॉइनची निर्मिती करण्यात आली होती, मात्र 2021 मध्ये ही क्रिप्टोकरन्सी प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
डॉज कॉइनचे फायदे
-या क्रिप्टोकरन्सी मध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
-हे सामान्य डिजिटल पेमेंटपेक्षा अधिक सुरक्षित आहेत.
-यामध्ये व्यवहार शुल्क खूप कमी आह.
-विविध प्रकारचे क्रिप्टोग्राफी अल्गोरिदममुळे यामध्ये खाती अतिशय सुरक्षित आहेत.
सध्याचे मूल्य
सोमवारी ट्विटरच्या लोगोवर डॉज दिसताच या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य पुन्हा एकदा वाढले आहे. सोमवारी मस्कच्या निर्णयापूर्वी, डॉज कॉइनचे मूल्य 6.35 रुपये (संध्याकाळी 5.30 वाजता) होते, परंतु लोगोमध्ये बदल झाल्यानंतर त्याचे मूल्य 8.45 रुपये (संध्याकाळी 7 वाजता) पोहोचले. म्हणजेच अवघ्या दीड तासात त्याचे मूल्य 30 टक्क्यांहून अधिक वाढले.
क्रिप्टोकरन्सी मध्ये डॉज कॉइन पाचव्या स्थानी
ट्विटरच्या लोगोवर झळकल्याने डॉज कॉइनचे नशीब बदलले आहे. 30 टक्के मूल्य वाढीसह डॉज कॉइन जगातील 5वी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनली आहे. सर्वाधिक मौल्यवान क्रिप्टोकरन्सीमध्ये पहिला क्रमांक बिटकॉइनचा लागतो. त्यानंतर इथोरियम, बिनान्स, एक्सआरपी आणि डॉज कॉइनचा क्रमांक लागतो.