पुणे – आजपर्यंत आपण ऊसापासून साखर, गूळ आणि काकवी तयार झालेली बघितली असेल, परंतु ऊसापासून कुल्फी बनवलेली कधी पाहिली आहे का? होय, पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ग्रुपने ऊसापासून कुल्फी, चटणी, स्लश, बर्फ गोळा, जाम हे सगळे पदार्थ बनवले आहेत.
ऊसापासून तयार केलेल्या या सगळ्या उपपदार्थांवर नागरिक अक्षरशः फिदा झाले आहेत. उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक लोक आईस्क्रीम आणि कुल्फीवर हमखास ताव मारताना दिसतात. याचाच विचार करून तेथील शेतकऱ्यांना उसापासून कुल्फी तयार करण्याची भन्नाट कल्पना सुचली.
दौंड तालुक्यातील आलेगाव येथील 10 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मॅजिक केन सेलिब्रिटिंग फार्मर्स ग्रुप बनवला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी ऊसापासून कुल्फी, चटणी, बर्फ गोळा, जाम बनवत आहेत. त्याला नागरिकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.
या 10 शेतकऱ्यांनी प्रत्येकी अर्धा एकर ऊसाची लागवड केली आहे. त्यातून ते ऊसापासूनचे उपपदार्थ बनवत आहेत. ऊसाचा रस फ्रोजन करुन ठेवला जातो. जर ऊस कारखान्याला दिला असता तर टनाला 2 ते 3 हजार रुपये मिळाले असते, परंतु त्यांना कुल्फी बनवल्यानंतर 15 हजार रुपये प्रति टन दर मिळतो आहे, असे समाधान दौंड येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.