कोथरूड – पौड रस्त्यावरील मेट्रो खांबांवर शिवसृष्टी, शिवजन्म सोहळा चित्ररूपात रेखाटण्यात यावा. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज आणि आपले शुरवीर मावळ्यांचा इतिहास, पराक्रम हा “याची देही याची डोळा’ अनुभवता येईल, अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्त आणि मेट्रो विभागाकडे केली आहे.
“जी20’च्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले. यामध्ये नळस्टॉप चौकासह अन्य ठिकाणी मेट्रो खांबांवर विविध मान्यवरांचे फोटो, त्यांच्या कविता, स्लोगन लावण्यात आल्या. नक्कीच त्यामुळे थोर व्यक्तींचे आदर्श नव्या पिढीला योग्य दिशा देण्यास मदत होईल, त्याचबरोबर पौड फाटा ते वनाज कॉर्नरपर्यंत मेट्रोचे अनेक खांबांवर असून याठिकाणी दुभाजकावर सुशोभिकरण करण्यात आले.
मात्र, या खांबांचा वापर सध्या फ्लेक्सबाजीसाठी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या पिलवर राजमाता जिजाऊ यांनी घडवलेले शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या खांबांवरच छायाचित्रांसह रेखाटली तर नक्कीच युवा पिढीसह पुणेकरांसाठी अभिमानाची बाब ठरेल, असे दीपक मानकर यांनी म्हटले आहे.
कोथरूड परिसर नेहमीच वेगळेपण जपत आला आहे. मेट्रो स्टेशनच्या परिसरात शिवसृष्टी उभारण्याबाबत महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पौड रोड सुशोभिकरण आणि राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घराघरापर्यंत पोहचावा, येता-जाता प्रत्येकाला तो अनुभवता यावा, यासाठी मेट्रो खांबांवर शिवसृष्टीचे चित्र रेखाटले तर नक्कीच कोथरूड परिसर शिवमय होईल.
– दीपक मानकर, माजी उपमहापौर, पुणे मनपा