पुणे -राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या “महिला सन्मान’ योजनेला पुण्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून, शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्थानकातून 15 दिवसात 80 हजार महिलांनी प्रवास केला आहे. पुण्यातून सातारा, कोल्हापूर, दादर, नाशिक, बीड आणि लातूर या ठिकाणी सर्वाधिक महिलांनी प्रवास केला आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात “महिला सन्मान’ योजना म्हणजेच महिलांसाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. एसटी महामंडळाने 17 मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. या योजनेला पुणे शहरात देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्थानकातून 17 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत 80 हजार 866 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यापुर्वी 65 ते 75 वर्षांच्या जेष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जात होती. आता महिलांनाही सवलत मिळणार आहे.
राज्य शासनाने नोव्हेंबरमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. जेष्ठांचा देखील एसटीच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. एसटीच्या या विविध योजनांमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली असून उन्हाळी सुट्टीत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.