पुणे – संरक्षण मंत्रालयाच्या एका विभागात कूक (आचारी) होण्यासाठी एकाने डमीला परीक्षेस बसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुक बणन्यासाठी दोघांची अगोदरच खिचडी शिजल्याचेही यानिमित्ताने तपासात समोर आले आहे. दोघांनाही विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
दिपु कुमार (वय 23, रा. बिहार) आणि शैलेंद्र सिंग (वय 24, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबात राहुल महेंद्रसिंह राठी (वय 42, रा. भैरवनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्रीफ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन काम करते. या विभागाद्वारे सीमावर्ती भागामध्ये रस्ते बांधणीचे काम चालते. या विभागात नोकरीसाठी स्वयंपाकीच्या (कुकच्या) जागा निघल्या होत्या. त्यासाठी 28 मार्च रोजी धानोरी येथील भैरवनगर येथे या विभागाच्या परीक्षा होणार होत्या. या परीक्षेसाठी शैलैंद्र सिंग या उत्तर प्रदेशच्या परीक्षार्थिने अर्ज केला होता. परंतु, दीपू कुमार याच्याबरोबर परीक्षेपूर्वी झालेल्या ओळखितून सिंग याने त्याला परीक्षेस डमी बसण्यासाठी गळ घातली. त्यातून दिपू कुमार देखील तयार झाला. या दरम्यान हॉल तिकीट घेऊन परीक्षेस बसलेल्या दीपू कुमार विषयी पर्यवेक्षकांना संशय आल्याने त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो गडबडला. त्यानंतर त्याच्याकडे आणखी विचारणा केल्यानंतर त्याने आपण डमी बसल्याचे व मुळ परीक्षार्थी बाहेर थांबल्याचे सांगितले. याबाबत संबंधीत विभागाने विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. दोघांकडेही फसवणुकीच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी सांगितले.