पिंपरी, दि. 29 – फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा जंगल ट्रेक वासोटा सफर चित्तथरारक झाला. या ट्रेकमध्ये बामणोली ते इंदवली बोटीने प्रवास व नंतर ट्रेक करून वासोटाची सफर करण्यात आली.
या ट्रेक मध्ये 18 सदस्यांनी भाग घेतला होता. क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांनी सुरक्षिततेच्या नियमांच्या सूचना दिल्या. या वेळी “जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांचा निनाद करून ट्रेकला सुरुवात करण्यात आली. कोयना नदीच्या खोऱ्यात अतिशय जंगलात वसलेला वासोटा किल्ला प्राचीन असून याची उंची 4366 फूट आहे. बामनोली इथून लॉंचने वनखात्याच्या परवानगीने किल्ल्यावर जाता येते. वनखात्यामुळे येथे प्लास्टिक व कचरा मुक्त असा किल्ला आहे. डोंगरावर निसरड्या व घसरड्या वाटा तुडवत व सुरक्षिततेची काळजी घेत घनदाट जंगलामधून दोन तासांत सर्वजण किल्ल्यावर पोहोचले. या किल्ल्याहून चकदेव, रसाळगड, सुमारगड व महिपतगड व नागेश्वरची गुहा व कोकण परिसर असा विलोभनीय परिसर दिसतो. बिना छपराचे मारुतीचे मंदिर, जुना वासोटा, बाबू कड्याचा कडेलोट, प्रतिध्वनी, काळकाईचे ठाणे व महादेवाचे सुरेख मंदिर सर्वांनी पाहिले. त्यानंतर शाहीर जयसिंग कांबळे यांनी हातात डफली घेवून वीरश्री संचारत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मर्दानी व जोशपूर्ण पोवाडा व “छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार” हे वीरश्री युक्त गाणे सादर केले. “ट्रेक लीडर” म्हणून लहू टावरे, आनंद गावडे, अतुल गावडे व संजय कुलकर्णी हे होते. सर्वजण रात्री चिंचवडला पोहोचलो.