मुंबई – छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टिका केली होती. यावरुन आता राजकारण तापायला सुरवात झाले असून अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
26 मार्च 2023 रोजी छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये शिरसाट यांनी अंधारे यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात अंधारे यांनी महिला आयोगात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली आहे.
शिरसाट यांनी अंधारे यांच्यावर टीका करताना पातळी सोडताना अर्वाच्य भाषेचा प्रयोग केला होता. इतकचे नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्याविषयी ही मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. दानवेंनी मला फोन करुन ती बाई डोक्याच्यावर झाली असल्याचे त्यांनी सांगितले, असा दावाही शिरसाट यांनी केला होता.
दरम्यान, अंधारे यांनीही शिरसाट यांच्या टिकेला उत्तर दिल आहे. अंधारे म्हणाल्या, शिरसाटांनी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते.
सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट यांच्या सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. अन् ज्याच्या ठायी शील पारमिता नाही, ती व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी तरी असू शकते का? असा प्रश्न उरतोच असेही अंधारे यावेळी म्हणाल्या.