मेक्सिको सिटी – मेक्सिकोच्या उत्तरेकडील शरणार्थ्यांच्या छावणीला लागलेल्या आगीमध्ये किमान 39 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 29 जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोच्या “नॅशनल इमिग्रेशन इन्स्टिट्युट’मधील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या सीमेजवळच्या शरणार्थ्यांच्या छावणीमध्ये ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
टेक्सास प्रांताच्या अल पासो भागातील सिउदाद जुआरेझ येथील या शरणार्थ्यांच्या छावणीबाहेर ओळीने मृतदेह ठेवल्याची दृश्ये वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली आहेत. ही आग सोमवारी संध्याकाळी भडकल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.
आगीत जखमी झालेल्यांना चार वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगीच्या दुर्घटनेबद्दल मेक्सिकोतील “नॅशनल इमिग्रेशन इन्स्टिट्युट’ किंवा चिहाहुओ प्रांताच्या अधिकाऱ्यांनी या आगीच्या दुर्घटनेबद्दल त्वरित प्रतिक्रिया दिली नव्हती.
सिउदाद जुआरेझ हे अमेरिका आणि मेक्सिको दरम्यानचे मोठे प्रवेशद्वार आहे. येथूनच मेक्सिकोतील शरणाथर्छी मोठ्या संख्येने अमेरिकेमध्ये प्रवेश करत असतात. शरणार्थ्यांची ही चावणी नेहमी गर्दीने पूर्ण भरलेली असते.
अमेरिकेतील प्रवेशाची मंजूरी मिळण्यासाठी शेकडो शरणार्थी या छावणीमध्ये अनेक दिवस मुक्कामाला असतात. या छावणीमध्ये लागलेल्या आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश मेक्सिकोच्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत.