पाचगणी – महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला कुंभरोशी गावातील वनसदृश्य 25 व 26/1 अ खासगी भूखंडावर शेकडो झाडांची कत्तल केल्याची माहिती पंचनाम्यावरुन स्पष्ट झाली आहे. महाबळेश्वर वन विभाग व महसूल विभाग यांनी सामाईक केलेल्या पंचनाम्यामध्ये एकूण 177 झाडे तोडली असल्यसाची धक्कादायक माहिती महाबळेश्वर तहसीलदारांना सादर केली आहे. वनसदृश्य जमिनीवर तोडलेल्या या झाडांच्या कत्तलीने आता पुढील कारवाई वन विभाग करणार का, याबाबत महाबळेश्वर तालुक्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.
मोजे कुभरोशी येथील सर्व्हे नंबर 26/ अ 1 व सर्व्हे नंबर 25 मध्ये बाळासो भोसले व अजय भोसले यांच्या क्षेत्रात अंजन, जांभुळ, आईन, पिसा, गिलोरा, करंवदे काटेरी, आंबोळी, केंजळ, टिपन, करड्या, हेळा, हिरडा, भोमा अशा 177 झांडाची कत्तल केल्याची माहिती पंचनाम्यात आहे. महाबळेश्वर तालुक्यात राजकीय वरदहस्ताने अनधिकृत बांधकाम व वृक्षतोडीला लगाम उरला नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी धनदांडग्यांनी बेसुमार वृक्षतोडीचा घाट घातला आहे. याबाबत पुढील कारवाई कोण करणार याची चर्चा आहे.