मुंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. मात्र, गौतमीच्या याच कातिल अदांची भुरळ बीडमधल्या एका हौशी जोडप्याला पडल्याचं पाहायला मिळालं आहे.
नवऱ्याने चक्क आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. सध्या, बीडमधल्या या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची चर्चा सगळीकडेच रंगली होताना दिसत आहे. किरण गावडे आणि प्रगती गावडे असं जोडप्याचं नाव असून, आपल्या पत्नीला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी किरण यांनी चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
दरम्यान, सगळ्या प्रकारावर बोलताना किरण गावडे म्हणाले की, “माझी पत्नी प्रगती गावडे हिच्या वाढदिवसाला मी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. माझ्या पत्नीनेच ही मागणी केली होती. तिच्या आग्रहासाठीच हा कार्यक्रम ठेवला होता. तो यशस्वी झाला. पत्नीची इच्छा मी पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे. ‘ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम…
बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जावळी तालुक्यातील खर्शी कुडाळ येथे 11 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबतची माहिती गौतमीने एक व्हिडीओ शेअर करून दिली.
गौतमीने व्हिडिओ शेअर करत म्हंटले आहे की, जावळी तालुक्यातील खर्शी कुडाळ येथे 11 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता माझा कार्यक्रम होत आहे. प्रसिद्ध गाडा मालक पै. सतिश भोसले यांच्या महाराष्ट्र चॅंपियन अश्विन बैलाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. मी येतेय, तुम्हीही नक्की या.. असं आवाहन गौतमीने चाहत्यांना केले होत.