मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. अशात मनसेने पाडव्याचा टीजर प्रदर्शित केला आहे.
मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आलेल्या टीजरमध्ये राज ठाकरेंच्या भाषणातील एक डायलॉग वापरण्यात आला आहे. “ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व” या टॅगलाईन खाली हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे ही पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील असा टीजरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
येत्या २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची तोफ मुंबईतील शिवतीर्थावर धडाडणार आहे. मनसेकडून या सभेसाठी जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. राज ठाकरे यावेळी नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.
॰॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥॰#मनसे_पाडवामेळावा #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/tNNFDn16nf
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 17, 2023
या मुद्द्यांवर काय बोलणार राज ठाकरे
शिंदे ठाकरे गटातील सत्तासंघर्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी निवडणूक
मनसेची आगामी वाटचाल आणि युती
राज्यात सुरु असलेले विविध क्षेत्रातील मोर्चे
सध्याचे शिंदे फडणवीस सरकार