हरिनारायण मठाच्या जुन्या कागदपत्रातून माहिती उघड
सातारा – छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या समाधीची मूळ जागा माहुली येथे सापडली आहे. येथील हरिनारायण मठाच्या सन 1756 मधील ऐतिहासिक कागदपत्रांवरून हा शोध लागला आहे. माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व जिज्ञासा मंचतर्फे याबाबत संशोधन करण्यात आले. या संदर्भातले मूळ दस्तऐवज महाराणी येसूबाई फाऊंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे नीलेश पंडित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडले. या शोधामुळे समाधी क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याला आता गती मिळणार आहे.
नीलेश पंडित म्हणाले, संगम माहुलीत शिरताना डाव्या बाजूला मोठा दगडी चौथरा आहे. या चौथऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाईंचे वृंदावन आणि त्याच्या मागे सगुणेश्वर देवालय आहे. सगुणाबाईंचा मृत्यू 25 जुलै 1748 रोजी झाला. या समाधीच्या पुढील बाजूस कृष्णा-वेण्णामाईची रथशाळा आहे. रथशाळेला लागून पूर्वाभिमुख अवाढव्य दगडी बांधकाम दिसते. हे बांधकाम म्हणजे महाराणी येसूबाईंचे समाधिस्थळ आहे. ही समाधी वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद आहे. या इमारतीवर राजघराण्याशी संबंधित चिन्हे कोरण्यात आली आहेत. या समाधीचा शोध ज्या इनामपत्रांच्या आधारे घेतला गेला, ती पत्रे येथील हरिनारायण मठाच्या दस्तऐवजामध्ये सापडली. यात 5 नोव्हेंबर 1756 रोजी लिहिण्यात आलेले पत्र असून, या पत्राची सुरुवात “श्रीमंत महाराज मातोश्री आईसाहेब’ या नावाने होते. 15 डिसेंबर 1749 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले.
या पत्रातील “श्रीमंत मातोश्री आईसाहेब’ म्हणजे ताराबाई राणी होय. पत्रातील मजकुरानुसार, वनमाळी बिनकमन माळी यांनी शाहूनगर, किल्ले सातारा म्हणजे सध्याच्या अजिंक्यताऱ्यावर जाऊन ताराबाई राणीसाहेबांना विनंती केली की, हरिनारायण देवाची स्थापना छत्रपती शाहू यांनीच केली. खेड तर्फ वंदन येथील रानात याची स्थापना करण्यात आली होती; परंतु देवालयावर अश्वत्थ वृक्ष उगवल्याने त्याची पडझड झाली होती. ताराराणी यांनी या देवालयाच्या जीर्णोद्धारासाठी मदत करण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारात महाराणी येसूबाईंच्या समाधीचा स्पष्ट उल्लेख असल्याचे सांगण्यात आले.
या देवालयाच्या उभारणीसाठी ताराराणी यांनी एक बिघा जमीन दिली होती. या जमिनीच्या चतु:सीमा निश्चित करताना, येसूबाईंची घुमटी, म्हणजे समाधी असा उल्लेख येतो. असे असले तरी हरिनारायण मठाच्या परिसरात राजघराण्यातील आणखी काही समाध्या आहेत. त्यामुळे येसूबाईंच्या समाधीचे स्थान निश्चित करण्यात अडचणी येत होत्या; परंतु एका जुन्या नकाशाच्या आधारे या समाधिस्थानावर शिक्कामोर्तब झाले आहे. या कामात माहुली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व हरिनारायण मठाचे ट्रस्टी पांडुरंग नेवसे यांचे सहकार्य लाभले.
समाधी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू
महाराणी येसूबाई फाउंडेशन राजधानी सातारा व जिज्ञासा इतिहास संशोधन संवर्धन सातारा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सदर समाधीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या कामांमध्ये महाराणी येसूबाई फाऊंडेशनचे संस्थापक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के यांनी पुढाकार घेतला आहे. या कामांमध्ये माहुली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व हरिनारायण मठाचे ट्रस्टी पांडुरंग नेवसे यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.
ताराबाई राणीसाहेबांच्या पत्रात उल्लेख
संगम माहुलीतील हरिनारायण मठाच्या परिसरात राजघराण्यातील आणखी काहींच्या समाधी आहेत. त्यामुळे महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीचे स्थान निश्चिती करताना अडचणी येत होत्या. मात्र, ताराबाई राणीसाहेबांनी देवालयाच्या जीर्णोध्दारास मदत करण्यासाठी जो पत्र व्यवहार केला आहे. त्या पत्र व्यवहारातून महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीचा स्पष्ट उल्लेख आहे. त्या परिसरात एक जुना नकाशाही प्राप्त झाला असून या नकाशाच्या आधारावर येसूबाई साहेबांच्या समाधी स्थानावर शिक्कामोतर्ब झाले आहे.