पिंपरी – औद्योगिक भागातील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी भंगार विक्रेत्यांना गोदामात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती केली होती. तसेच गोदामात आलेल्या आणि गेलेल्या मालाचीही नोंद करण्यास सांगितले होते. त्यावर पोलिसांनी देखरेख असल्याने चोरीच्या घटनांना आळा बसला होता. मात्र आता भंगार दुकानदारांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने भंगार माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत.
शहरातील चाकण, चिखली, तळेगाव, एमआयडीसी भोसरी या परिसरात अनेक मोठमोठे कारखाने आहेत. या कारखान्यांना लागणारे छोटे-छोटे पार्ट तयार करणारे हजारो लघुउद्योग या भागात आहेत. पार्ट तयार करीत असताना त्यातून भंगाराची निमिर्ती होते. हे भंगार खरेदी करण्यासाठी काहीजण धडपडत असतात. यातूनच काही गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घमासान झाल्याचे देखील यापूर्वी समोर आले आहे. दरम्यानच्या काळात भंगार माफियांवर खंडणीचे गुन्हे दाखल केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. याव्यतिरिक्त औद्योगिक परिसरात भंगार किंवा कच्च्या मालाची चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. सुरक्षारक्षकांची नजर प्रसंगी शस्त्राचा धाक दाखवून चोरटे कंपनीतील मालावर डल्ला मारतात.
कंपन्यांमध्ये हात साफ केल्यानंतर चोरटे चोरी केलेल्या मालाची भंगार व्यावसायिकांना विक्री करतात. भंगार व्यावसायिक देखील या मालाची लगोलग शहराबाहेर विल्हेवाट लावतात. त्यामुळे भंगाराच्या दुकानाची तपासणी केल्यावरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व भंगाराच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच, आलेल्या आणि गेलेल्या मालाची वाहनांच्या क्रमांकासह नोंद ठेवावी, असे आदेश वर्षभरापूर्वी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, आता त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने शहरातील भंगार माफिया पुन्हा सक्रीय झाले आहेत.
चाकण, तळेगाव, महाळुंगे आदी भागात असलेल्या कंपनीत निर्माण होणारे भंगार आम्ही सांगू त्या किंमतीत आणि आम्हालाच द्यावे, अशी मागणी काही गावगुंड करतात. प्रसंगी कंपनीच्या अधिकाऱ्याला दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्कीही करतात. चाकण परिसरात असलेल्या एका भंगार माफियाला मोक्का लावण्याची तयारी पोलिसांनी केली होती. मात्र तात्कालीन आयुक्तांची बदली झाल्यावर हे प्रकरण मागे पडले आणि तो भंगार माफिया पुन्हा सक्रिय झाला.
महिलांच्याही टोळ्या
औद्योगिक भागात भंगाराची चोरी करणाऱ्या महिलांच्याही काही टोळ्या सक्रिय आहेत. कंपनीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला यापैकी एखादी महिला भुरळ घालते. तर दुसऱ्या बाजने इतर महिला कंपनीत जाऊन भंगाराची चोरी करतात. या महिला भंगार चोरीसाठी लहान मुलांचाही वापर करीत असल्याचे यापूर्वी उघडकीस आलेल्या गुन्ह्यातून दिसून आले आहे.
चोरीची वाहनेही भंगारात
शहरातील काही भंगार माफिया चोरीची वाहने अत्यंत कमी दरात खरेदी करतात. या वाहनांचे वेगवेगळे सुटे भाग करून त्यांची गॅरेजवाल्यांना बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात विक्री करतात. त्यामुळे भंगाराच्या गोदामांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सक्ती हवीच, असे काही पोलीस अधिकारी
खासगीत सांगतात.