पुणे -जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सात तालुक्यांना बसला आहे. इंदापूर येथे वीज पडून 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 44.3 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरुर या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 18.20 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवेलीमध्ये 0.80 मिमी, मुळशीमध्ये 1.17 मिमी, मावळमध्ये 8.73 मिमी, जुन्नरमध्ये 6 मिमी, खेडमध्ये 4 मिमी आणि शिरुरमध्ये 0.44 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
कृषी व महसुल विभागाकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील 2 गावात द्राक्ष पिक, कांदा, गहू व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. तर खेड तालुक्यातील 20 गावांमधील शेतीचे नुकसान झाले आहे. या 20 गावांतील 38.5 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये प्रामुख्याने गहू, आंबा आणि भाजीपाला यांचा समावेश आहे.
पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानीमध्ये वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.